नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दूषित पाण्यामुळे आपल्याला दरवर्षी विविध आजारांना सामोरं जावं लागतं. काविळ, टायफॉइड, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज अशी जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी माध्यमांना दिली.
कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांची संख्या आजमितीस सुमारे पंधरा लाखांपेक्षा अधिक झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे आणि त्यातही नागरिकांना होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणे हे केडीएमसी प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. नागरिकांना पुरवले जाणारे पाणी हे कितपत शुद्ध आहे, त्यामध्ये काही विषाणूंचा प्रादुर्भाव तर नाही ना आदी गोष्टी तपासण्यासाठी दर एक दिवसाआड पाण्याचे नमुने गोळा करून कोकण भवन येथील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठवले जातात. मात्र त्याचे अहवाल येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला वाट पाहावी लागते.
विशेषतः पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने केडीएमसी प्रशासनाला पाणी पूरवठयाबाबत अधिक सतर्क राहावे लागते. मात्र पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल प्राप्त होण्यास लागणारा विलंब पाहता केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.
तसेच केडीएमसीकडून आतापर्यंत केला जाणारा पाणीपुरवठा हा शुद्धच असतो. मात्र त्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासण्या, दूषित पाण्याद्वारे आजार पसरवणाऱ्या विषाणूंची माहिती, पाण्यातील क्लोरीनसह इतर घटकांचे प्रमाण योग्य आहे की नाही याबाबत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्याचा सर्वंकष विचार करून केडीएमसीकडून ही सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक लागणारी प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या ३-४ महिन्यात ही प्रयोगशाळा उभारली जाईल अशी माहितीही शहर अभियंता अहिरे यांनी दिली.
दरम्यान केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यात त्याची महत्वाची भूमिका असेल यात कोणताही वाद नाही.