कल्याण /प्रतिनिधी – कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकासाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकल मधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसाचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशाचे करोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असून उद्या गुरुवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशासाठी मदत कक्ष सुरु केले जाणार आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातकल्याण ,डोंबिवली ,कोपर,ठाकुर्ली ,शहाड ,आंबिवली ,टिटवाळा या रेल्वे स्थानकावर तिकीट काउंटर शेजारीच महापालिकेकडून मदत कक्ष उभारण्यात येणार असून उद्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे मदत कक्ष सुरू राहणार आहेत.
कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत(प्राधान्याने आधारकार्ड) घेवून आलेल्या नागरिकांची सर्व प्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये सदर कागदपत्रांची पडताळणी होऊन मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी (Verified) केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र व ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.
नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य राहील. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सदर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील, अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.नागरिकांना फक्त मासिक पास मिळणार आहे दैनदिन तिकीट मिळणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे