DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – शासनाने अधिसुचित केलेल्या 58 सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेशान्वये संपूर्ण महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत. महानगरपालिकेने स्वत:हुन आणखी 49 सेवा नागरीकांच्या सेवेकरीता अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट कालावधीमध्ये नागरीकांना सेवा देणे बंधनकारक आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दि. 04/07/2015 च्या आदेशान्वये शासनाकडील 15 सेवा अधिसूचित केल्या होत्या आणि नंतर दि. 12/06/2023 च्या आदेशान्वये शासनाकडील 12 सेवा व महापालिकेकडील 05 सेवा अशा 17 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडील 31 सेवा व महापालिकेकडील 44 सेवा अशा एकूण 107 लोकसेवा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना पुरविण्यात येत आहेत. यामध्ये नागरीकांना मुदतीत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होतील अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
या सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी तसेच ती सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलिय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नियत कालमर्यादा अधिसुचित करण्यात आली आहे. शासन निर्णयातील निर्देशानुसार या नागरी सेवांचे कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळावयाचे असल्याने याबाबतचे गांर्भीय लक्षात घेवून, तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी आणि कर्तव्यपूर्ती न करणा-या पदनिर्देशित अधिकारी हे अध्यादेशातील तरतुदीनुसार व्यक्तिश: जबाबदार राहतील व अशा पदनिर्देशित जबाबदार अधिका-यांविरुध्द्व संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी अधिसूचनेतील तरतुदीनुसार यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पाडावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निर्गमित केले आहेत.