नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करने पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाला चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.
केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांचा केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा कंत्राटी चालक कर्मचारी दुचाकीने पाठलाग करत होता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेले आयकार्ड पाहिले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत कर्मचाऱ्याची चौकशी केली. संबंधित विभागाला कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. याबाबत कर्मचारी कुणाला तरी माहिती देत असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी कुणाला काय माहिती देत होता? हे चौकशी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.