नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण महाराष्ट्र शासनाच्या संस्थेकडे महानगरपालिकेने उर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला महानगरपालिका व हॉस्पिटल इमारत या संवर्गात १७ वा राज्यस्तरीय प्रथम असे दोन पुरस्कार मिळालेले आहे. या पुरस्कारामुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.
‘मेडा’ या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती या वर्षीच्या १७ व्या राज्यस्तरीय उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने नेमून फॉरमॅटमध्ये ऊर्जा संवर्धन व उर्जा बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा, जल/मल निःसारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती माहे सप्टेंबरमध्ये पाठविली होती. तसेच दि.२२/११/२०२२ रोजी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या निवड समितीसमोर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रशांत भागवत यांनी उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांचे, राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले होते.
महानगरपालिका क्षेत्रात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले तसेच महानगरपालिकेने नविन इमारतींना सौरउर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे. त्याअनुषंगाने, आतापर्यंत सुमारे १८१४ इमारतीवर १ कोटी LPD क्षमतेचे सौर उष्ण जल संयंत्रे व ३५ इमारतींवर ०.५ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांकडून इमरतींवर बसविल्यामुळे संपूर्ण शहरात १८ कोटी युनिटची विजेची बचत होत आहे. पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले आहेत. रूक्मिणीबाई रूग्णालयात उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून नविन एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम उद्वाहन यंत्रणा व वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे.