नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई/प्रतिनिधी – जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर आहे. जेएनपीएला एमएसईडीसीएलची वीज वितरण फ्रँचायझी मिळाली आहे. एमएसईडीसीएलची वीज वितरण फ्रँचायझीचा पहिला टप्पा 21 डिसेंबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आला. याचबरोबर जेएनपीए टाउनशिप येथे स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम सुद्धा सुरू करण्यात आली. वीज वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष आणि जेएनपीएमधील सर्व टर्मिनल ऑपरेटरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जेएनपीएला प्राप्त झालेल्या एमएसईडीसीएलच्या वीज वितरण फ्रँचायझीचे महत्त्व अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, “एमएसईडीसीएलसोबत सामंजस्य (एमओयू) करार करून वीज वितरण फ्रँचायझी (डीएफ) प्राप्त करणारे जेएनपीए पहिले प्रमुख बंदर ठरले आहे. आमच्यासाठी हे एक मोठे यश आहे. यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना, हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येईल.”
“आम्ही केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 उपक्रमांतर्गत जेएनपीए टाउनशिप येथे जीएसएम/आरएफ आधारित व रिमोटने नियंत्रित होणारी स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे. हा आमचा एक पथदर्शी प्रकल्प आहे,”असे सेठी यांनी सांगितले.