नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. भाजपने नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण मैदानात असणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड मतदार संघात अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिलेली आहे.
नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले “नरेंद्र मोदींना गांधी परिवाराची एवढी काळजी करण्याचे काही कारण नाही आहे देशातील जनता गांधी परिवारासोबत आहे. देशासाठी दहा वर्षात त्यांनी काय केलं? ते नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं पाहिजे. तुम्ही गांधी आणि नेहरु विचारांवर खुप भाषणं केलीत, त्यांच्या विरोधात केलीत. दहा वर्षांत खोटं बोलून नेहरु परिवाराचा, गांधी परिवाराचा खोटा इतिहास सांगून देशात सत्तेत आलात. पण देशात सत्तेत आल्यावर काय केलं? याच्यावर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे.” असा हल्लाबोल नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या बीजेपी वर केला.