नेशन न्यूज मराठी टिम.
जालना/प्रतिनिधी– जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले असून घटनेची माहिती वार्यासारखी पसरत महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत असल्याचे पहावयास मिळत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तातडीने जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलकांच्या संपर्कात पोलीस प्रशासन होते. दरम्यान उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने पोलीस व प्रशासन त्यांच्या प्रकृतीची पडताळणी करून पुढील औषधोपचारासाठी त्यांना तिथून घेऊन जाण्यासाठी त्यांना मनधरणी करत होते. पोलिसांच्या या प्रयत्नाला जरांगे पाटील यांनी प्रतिसाद ही दिला होता. मात्र, अचानक जमावाने पोलिसांवर विशेषतः महिला पोलिसांवर, दगडफेक केली. त्यात जवळपास ४५ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले असून त्यातील काहींवर अंबड उपजिल्हा रुग्णालयात तर काहींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आसल्याची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. त्यांनी जालना जिल्हा सरकारी रुग्णालयात घेऊन जखमींना भेट घेत विचारपूस केली. घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा झाला आहे, याबद्दल समाज माध्यमांच्या वतीने चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही चव्हाण म्हणाले. नागरिकांना कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन केले.