नेशान न्यूज मराठी टीम.
नांदेड – नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात एक मोठा वर्ग होता त्यांना लोकशाही मार्गाने सोबत घेऊन अनेकदा राजकीय परिवर्तन घडवून आणलं होतं. आंबेडकरवाद्यांची एकतेची मुठ बांधुन ओबीसी मायक्रो ओबीसी यांच्या साथीने इथे भल्याभल्यांना धुळ चारली होती. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून मोठ मोठ्या उलथापालथी घडवून आणल्या गेल्या. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्हा हा सामाजिक आणि राजकीय प्रयोगाच्या चर्चेचा विषय ठरला होता. परंतु अलीकडच्या काळात येथिल ओबीसी आणि आंबेडकरवादी कार्यकर्ता थोडा थांबला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय परिवर्तन एका रात्रीत होत नसते.
त्यामुळे राजकीय यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. प्रस्थापितांच्या मोहातुन बाहेर पडावेच लागेल. वंचितांची भूमिका घेऊन दिवसरात्र कष्ट करण्याना साथ द्यावी लागेल. वर्षानुवर्षे आम्हीच संघटनेचे मालक आहोत हि वृत्ती सोडावी लागेल. सर्व समाजाला या चळवळीत सन्मानाने सहभागी करून सोबत घ्यावे लागेल. आंबेडकरवाद्यांनी आता पालकांच्या भूमिकेत येणे गरजेचे आहे. अभ्यास पूर्ण माहितीच्या आधारावर आणि संघटनात्मक कौशल्यावर आधारित काम करावे लागेल तेव्हाच यश मिळेल. पहिल्यासारखाच हा जिल्हा परत उभा करून वंचितांना सत्तेत सहभागी करावं आणि आलेलं सामाजिक व राजकीय नैराश्य संपवावे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेड मध्ये प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी नागोराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्र आढावा स्वतः आंबेडकर यांनी घेतला. प्रत्येक पदाधिकार्यांच्या अडचणी वैयक्तिक लक्ष घालून समजून घेत उपाययोजना सुचविल्या पक्षाच्या सर्व आघाड्यांवर काम करणाऱ्या पदाधिकार्यांना जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सुचना दिल्या. या दोन दिवसीय दौऱ्याने नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या नियोजनबद्ध दौऱ्यात पक्षाचे विभागीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष महासचिव तालुकाध्यक्ष महासचिव शहराध्यक्ष महासचिव महिला आघाडीचे पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी यांच्या सह महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.