बुलढाणा/प्रतिनिधी – शेतकरी रक्ताचे पाणी करून शेतात घाम गाळतो. पिकांचे नुकसान झाले तरी भविष्यात आपल्या पिकाला चांगला भाव येईल या एका आशेवर ते काळ्या आईची सेवा करतात. पण नेहमी या गरीब शेतकऱ्याची नशीब थट्टा करते. पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून अनेक शेतकरी आपल्या मालाची विक्री व्यापाऱ्याला करतात. पण अनेकदा हे व्यापारी शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे त्यांना देत नाहीत. असाच प्रकार बुलढाण्यात घडला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील देऊळघाट येथील व्यापाऱ्याने उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन व तूरसह अन्य शेतमालाची खरेदी केली होती. पण आज 3 ते 4 वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाही.
शेतकऱ्यांकडून अनेकदा या व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्याने पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट देऊळघाट गाठून व्यापाऱ्याला धारेवर धरले. मात्र तरीही व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये अजूनही दिले नाही. व्यापाऱ्यांचे नाव अ.लतीफ, अ.अजीज, कोहिनुर ट्रेडर्स असे आहे. व्यापाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले शेतमाल इतरत्र न विकता आपली फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी केले आहे.