नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणचे रहीवाशी आयटी तज्ञ कासम शेख यांनी सलग दुसऱ्यांदा आयटी क्षेत्रातील जगविख्यात कंपनी मायक्रोसॉफ्टचा एमव्हीपी (Most Valuable person) पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे भारतातील केवळ चौघा आय टी तज्ञांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असून महाराष्ट्रातून कासम शेख हे एकमेव व्यक्ती ठरले आहेत.त्यांनी कल्याणच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे.
मायक्रोसॉफ्टने गेल्या आठवड्यात आपल्या वेबसाईटद्वारे या पुरस्कारांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये जगभरातील १०४ आय टी तज्ञांची त्यासाठी निवड केली आहे. कल्याणकर आयटी तज्ञ कासम शेख यांनी AI (Artificial Intelligence) या श्रेणीमध्ये हा MVP (Most Valuable Professional) पुरस्कार पटकावला आहे.
कासम शेख हे कॅपजमिनी या IT क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीमध्ये Senior Manager पदावर कार्यरत असून त्यांनी AI तंत्रज्ञानावर ४ पुस्तके लिहिली आहेत. तसेच युट्युबवरही ते AI तंत्रज्ञान संबंधी मार्गदर्शन करत असतात. हल्ली बरेच लोक स्वतःचे, आपल्या आवडत्या व्यक्तीचे फोटो, AI च्या माध्यमातून एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. परंतु AI टेक्नॉलॉजीचा वापर केवळ यासाठीच न होता तो इतरही अनेक अडचणी सोडवण्यासाठीही होऊ शकतो असे मत कासम शेख यांनी यावेळी व्यक्त केलं.
तसेच AI टेक्नॉलॉजी, महाराष्ट्रातील शिक्षण विभाग आणि इतर सर्वांगीण विकासासाठी कशी उपयोगात आणता येईल यासंदर्भात लवकरचं आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे कासम शेख यांनी सांगितले. तर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही काही महिन्यांपूर्वी कासम शेख यांना आमंत्रित केलं होतं . AI टेक्नॉलॉजीचा निवडणुक प्रक्रियेत कसा वापर करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
सध्या AI ही टेक्नॉलॉजी ही जगभरात भरपूर ट्रेंडमध्ये असल्याचे दिसते. त्यात अशा प्रकारचा अतिशय प्रतिष्ठित असा मायक्रोसॉफ्ट चा MVP (Most Valuable Professional) पुरस्कार हा एका मराठी माणसाला मिळणे हे केवळ कल्याणकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया कासम यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.