नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी -जालना जिल्ह्यात मनोज जरंगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची समाजाच्या सर्वच थरातून चर्चा होताना दिसत आहे. अनेक राजकीय कार्यकर्ते याची दखल घेत जालन्यात जरंगे ह्यांची भेट घेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आंदोलनाला पाठींबा देत आहेत. अजूनही सरकारकडून यावर ठोस आश्वासन मिळालेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व उपोषणकर्ते मनोज जरंगे यांच्या मागण्या मंजूर कराव्या या मागणीसाठी जालन्यात एका व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील 11 दिवसांपासून शांतिपूर्वक आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने कुठलाही निर्णय झालेला नसल्याने संतप्त व्यक्तीने अखेर टोकाचे पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी वेळीच त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान तालुका जालना पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया तालुका जालना पोलीस ठाण्यात सुरू आहे.