नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – भारताच्या नेमबाज ह्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा दखल घेणारी कामगिरी इस्लामपूरच्या साक्षीने केली आहे. अजर बैजान या देशांमधील बाकू या शहरामध्ये झालेल्या पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या साक्षी अनिल सूर्यवंशीच्या टीमनं सुवर्णपदक पटकावलं आहे. साक्षी ही मूळची वाळवा तालुक्यातील साखराळे गावची कन्या आहे.
फ्री पिस्टल ५० मीटर इव्हेंट या प्रकारात तिने हे यश मिळवले आहे. साक्षी सूर्यवंशीच्या टीममध्ये टियाना आणि करणदीप कौर या सहकाऱ्यांचा समावेश आहे. साक्षी आणि तिच्या सहकाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले असून इस्लामपूर शहराच्या लौकीकातही भर पडली आहे. साक्षी ही इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या बीसीएच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड तिने सार्थ ठरवून दाखवली आहे. ह्यासाठी सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.