नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बाळासाहेब आंबेडकर यांची INDIA आघाडीत येण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारणाऱ्या सीताराम येचुरी यांना, ‘दलितांना सत्तेत बरोबरीने वाटा देण्याची INDIA आघाडीची खरोखर तयारी आहे का?’ असा रोकठोक सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे. तसेच काँग्रेस आता सीपीआय (एम)चा त्यांचा प्रवक्ता म्हणून वापर करत असल्याचा टोलाही लगावला आहे.
सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी औरंगाबाद येथे बाळासाहेब आंबेडकर यांची INDIA आघाडीत येण्याची इच्छा आहे का असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीने सीताराम येचुरी यांना टॅग करून ट्विट केले आहे.
ट्विट मध्ये लिहिले आहे की,
“प्रिय @SitaramYechury, जी आम्ही तेच ते प्रश्न ऐकून आणि त्याची उत्तरे देऊन कंटाळलो आहोत.
हे प्रश्न बाळासाहेबांना पुन्हा पुन्हा विचारण्यापेक्षा आता आपण INDIA आघाडीला हे विचारणे गरजेचे आहे की, कधीपर्यंत दलितांचे मसिहा बनण्याचे ढोंग रचणार आहात?
दलितांचे राजकारण आपल्या वर्चस्वाखाली ठेवणार? दलितांना सत्तेत बरोबरीने वाटा देण्याची त्यांची खरोखर तयारी आहे का?” असा रोकडा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच “राष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे नाव सुचवल्यावर काय झाले होते? काँग्रेसचा प्रतिसाद काय होता ते आता सीताराम येचुरींनी देशाला सांगावे.
बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होती. दलित विरुद्ध दलित का? व कशासाठी?त्याऐवजी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आदिवासीं उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी द्यावा, हा ॲड प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव होता. एका वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय UPA ला मिळू शकले असते.” अशी आठवणदेखील येचुरी यांना करून दिली आहे.
INDIA आघाडीची मुंबईत बैठक सुरू असताना वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण दिल्याच्या खोट्या बातम्या काँग्रेसकडून पेरण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात वंचित बहुजन बहुजन आघाडीला कोणतेही निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते. 1 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून INDIA आघाडीत सहभागी होण्याची इच्छा असल्याचे कळविले होते, तसेच निमंत्रण दिल्याच्या अफवा थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्याप काँग्रेसकडून या पत्राला कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.असेही वंचित बहुजन आघाडी कडून सांगण्यात आले आहे.