कल्याण/प्रतिनिधी – अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करावा, अशा सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिल्या. गेल्या आठवडयात महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतांना आजच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी उपस्थित सर्व विभागीय उपआयुक्त व सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी, इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधतांना या सुचना दिल्या.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी साचलेल्या परिसरात साथरोगाची लागण होऊ नये म्हणून सगळीकडेच जंतूनाशक, दुर्गंधीनाशक फवारणीची काय स्थिती आहे, याचा आढावा आयुक्तांनी आज घेतला. जिथे – जिथे अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण होतात तिथे तिथे कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक प्रभाग अधिका-याने अशा परिस्थितीत उद्भवलेल्या समस्या आणि त्यासाठी कायमस्वरूपी करावयाची उपाययोजना याबाबत अहवाल तयार करावा, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
छोटया नाल्यांची सफाई नीट झाली नसल्यामुळे पाणी तुंबण्याचा घटना घडल्याचे दिसून आले, याकरीता छोटया नाल्यांची कटाक्षाने सफाई करावी. महापालिकेने आता स्वत:चा डिझाईटर्स फोर्स उभारावा, अशा सुचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. प्रभागक्षेत्र अधिका-यांनी आपत्ती समयी धावून येणा-या स्वयंसेवकांना निवडून त्यांचा अंतर्भाव या फोर्समध्ये करुन त्यांना प्रशिक्षण दयावे, आवश्यक असेल तेव्हा अतिरिक्त मनुष्यबळ आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करुन घ्यावे, अशाही सुचना या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.