नेशन न्यूज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी– भारतीय नौदलाच्या सुनयना जहाजाने 21-25 ऑगस्ट 23 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन या बंदराला भेट दिली. क्षेत्रातील सर्वांसाठी विकास आणि सुरक्षा (SAGAR) या पंतप्रधानांनी मांडलेल्या दृष्टिकोनाला अनुसरून सागरी भागीदारांसोबतचे भारताचे संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होती. या भेटीदरम्यान, भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकेतील नौसैनिक, व्यावसायिक आणि प्रशिक्षण संवाद, डेक भेटी आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले. नौसंचालन, अग्निशमन, हानी नियंत्रण आणि जहाजावर शोध व जप्ती अशा विविध बाबींवर संयुक्त प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती. ‘वसुधैव कुटुंबकम’ संदेशाचा प्रचार करत, दक्षिण आफ्रिकेच्या नौदलकर्मींसह आयएनएस सुनयना जहाजावर एक संयुक्त योग सत्रही आयोजित करण्यात आले.
अभ्यागतांसाठी 23 ऑगस्ट रोजी जहाज खुले ठेवण्यात आले होते. डर्बनमधील भारताच्या महा-वाणिज्यदूत डॉ. थेल्मा जॉन डेव्हिड यांनी जहाजाला भेट दिली आणि जहाजाचे कार्य आणि क्षमता जाणून घेतल्या.
जहाजाने संयुक्तता आणि आंतरकार्यक्षमतेला चालना देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाचे जहाज एसएएस किंग सेखुखुने सोबत सागरी भागीदारी सराव (MPX) केला.
सागरी सहकार्य आणि भागीदारी वाढवण्याच्या दिशेने दोन्ही नौदलांनी वचनबद्धता व्यक्त केली असून ही भेट यशस्वीरीत्या पूर्ण झाली.