नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या दूरच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आग्नेय आशियात तैनात आयएनएस सुमेधाने 27 ऑगस्ट 2022 रोजी मलेशियातील पोर्ट कलांगला भेट दिली. जहाज ऑस्ट्रेलियातल्या पर्थ येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सहभागी झाले होते. तिथून परतीच्या मार्गावर जहाजाने कलांग बंदराला भेट दिली.
भारतीय नौदल आणि रॉयल मलेशियन नेव्ही यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, सागरी सहकार्य आणि आंतर कार्यक्षमता वाढवणे हे आयएनएस सुमेधाच्या कलांग बंदरामागील भेटीचे उद्दिष्ट आहे. दोन्ही नौदले विविध आघाड्यांवर सहकार्य करत असून सागरी सुरक्षा आणि जागतिक सामायिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशाखापट्टणम येथे मीलन 2022 मध्ये केडी (KD) लेकीऊ सहभागी झाली होती. त्यानंतर मे 2022 मध्ये कोटा किनाबालू येथे द्विपक्षीय सागरी सरावात समुद्र लक्ष्मण सहभागी झाली होती. यामुळे दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय प्रतिबद्धता वाढत आहे.
कलांग बंदर येथे पोर्ट कॉलदरम्यान, आयएनएस सुमेधावरील नाविक गण रॉयल मलेशियाच्या नौदलातील कर्मचार्यांसह व्यावसायिक संवाद, ज्ञानाचे आदानप्रदान, परस्परांच्या डेक भेटी आणि खेळ यात सहभागी होतील. शाळकरी मुलांच्या भेटीसाठीही हे जहाज खुले राहणार आहे. आयएनएस सुमेधा मलेशियाच्या जहाजांसह सागरी भागीदारी सरावामध्ये देखील सहभागी होणार आहे.
आयएनएस सुमेधा हे नौदलाचे स्वदेशी बनावटीचे गस्तीचे जहाज आहे. स्वतंत्र तसेच आरमारी तांड्यातील जहाजांसोबतच्या मोहिमांसाठी विविध प्रकारच्या कार्याकरिता तैनात आहे. ते विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व आरमारी तांड्याचा भाग आहे आणि पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत कार्य करते.