नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – गणेशाचे विविध रूप साकारण्यासाठी गणेश मूर्तिकार दिवसेंदिवस आपल्या कल्पकतेला मूर्तीच्या रुपात आकार देत असतो. यातून कलेचे सादरीकरण करताना आपल्या पारंपारिक सणाचे पावित्र्य राखले जाईल याकडे हे मुर्तीकलाकार लक्ष देत असतात. आपल्या कल्पकतेला सृजनशीलतेची जोड देत असेच एक कलाकार कुटुंब सिन्नर येथे आगळ्यावेगळ्या गणेश मूर्तीच्या संकल्पनेला आकार देत आहेत.
सिन्नर येथील कलाकार संजय क्षत्रिय गेल्या २६ वर्षांपासून पत्नी व मुलीच्या मदतीने गणरायाला आपल्या कलेच्या माध्यमातून विविध रुपात साकारत आगळेवेगळे वंदन करत आले आहे. दरवर्षी विविध रूपातून त्यांनी आतापर्यंत तब्बल ३९ हजार सूक्ष्म गणेशमूर्ती निर्मितीचा विक्रम केला आहे. यंदा या कुटुंबाने केदारनाथ, बद्रीनाथ या मंदिराप्रमाणेच बारा ज्योतिलिंग व विविध प्रसिद्ध मंदिरांच्या एक इंच ते सहा इंच आकाराच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. या साकारल्या गेलेल्या आगळ्यावेगळ्या सूक्ष्म प्रतिकृती आजूबाजूच्या परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.