डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना नागरिकांची गैरसोय होत होती. गणेशोत्सवाच्या तोंडावर येत्या दहा दिवसात हा पूल पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीतील शिवसैनिकांनी पुलाची पाहणी केली असून विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वीच कोपर पुलाचे विघ्न सरणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
सप्टेंबर २०१८ रोजी कोपर पूल कमकुवत झाल्याने रेल्वेकडून तो प्रवासासाठी बंद करण्यात आला होता. मात्र हा पूल आता गणेशोत्सवाच्या पूर्वी सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची पूर्वीची रचना आणि आताच्या रचनेत थोडा बदल करण्यात आला असून राजाजी पथ रस्त्याच्या वरून जाणाऱ्या पुलाला थोडी अधिक उंची दिली असल्याची माहिती शिवसैनिक राजेश कदम यांनी यावेळी दिली. हे काम जलद गतीने पूर्ण करण्याकडे शिवसेना लक्ष देत असून खासदार श्रीकांत शिंदे याकडे जातीने लक्ष देत असल्याचे संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीत नवीन रस्ते बनविण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटानंतर बाप्पाचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याने हा पूल सुरू झाल्यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि आनंद आणखीन द्विगुणित होईल असे मत प्रथमेश थोरात यांनी व्यक्त केले. यावेळी पाहणी करण्यासाठी शिवसैनिक राजेश कदम, उपशहर संघटक विवेक खामकर आणि संतोष चव्हाण, उपविभाग प्रमुख प्रथमेश खरात आदी उपस्थित होते.
- August 26, 2021