नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली नौदलाच्या गोलंदाजी( तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन) आणि क्षेपणास्त्र युद्धनीतीचे उत्कृष्टता केंद्र असलेल्या आयएनएस द्रोणाचार्य येथे 13 आणि 14 नोव्हेंबर 23 रोजी तोफचालन परिसंवाद 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
दर तीन वर्षांनी आयोजित होणारा हा परिसंवाद तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन क्षेत्रातील तज्ञांना भविष्यकालीन तंत्रज्ञान आणि सेन्सर्सचा परिचालनात्मक पुरेपूर वापर याविषयीचे त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. या कार्यक्रमाला नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार जे स्वतः गोलंदाजी क्षेत्रातील विशेषज्ञ आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सदर्न नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफ ध्वजअधिकारी वाईस ऍडमिरल एमए हंपीहोली आणि अनेक वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यातील आणि आघाडीच्या युद्धनौकांवरील तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन विशेषज्ञ देखील या परिसंवादाला उपस्थित होते.
तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन युद्धनीतीमधील उदयोन्मुख तंत्रज्ञान ही यंदाच्या परिसंवादाची प्रमुख संकल्पना होती आणि नामवंत पॅनेलिस्टनी अनेक संशोधनपत्रे यामध्ये सादर केली. भावी काळातील मोहिमा आणि तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाबाबत आधुनिक नौदलाचा आग्रही पाठपुरावा आणि भविष्यासाठी सज्ज दलाकरिता प्रशिक्षण या विषयांचा परिसंवादातील प्रमुख विषयांमध्ये समावेश होता. या परिसंवादात सादर करण्यात आलेल्या संशोधन पत्रिका आणि पेपर्सचे संकलन देखील यावेळी प्रकाशित करण्यात आले.
अतिशय तरबेज गोलंदाज(तोफचालक) म्हणून प्रसिद्ध असलेले माजी सीएनएस निवृत्त ऍडमिरल दिवंगत आर एल परेरा यांच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.