नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत-फ्रान्स चा संयुक्त लष्करी सराव “शक्ती” चा सातवा पर्व सुरू आहे. हा सराव मेघालयातील उमरोई येथील संपूर्णतः विकसित आधुनिक परदेशी प्रशिक्षण केंद्रात घेतला जात आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत थियरी माथौ तसेच 51 उप क्षेत्राचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग, मेजर जनरल प्रसन्न सुधाकर जोशी यांच्या उपस्थितीत संयुक्त सरावाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले. या लष्करी सरावाचे समापण 26 मे रोजी होणार आहे. भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये आळीपाळीने शक्ती या द्वैवार्षिक संयुक्त सराव उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर 2021 मध्ये फ्रान्स येथे या सरावाचे या आधीचे पर्व पार पडले होते. आता होत असलेल्या सरावात भाग घेणाऱ्या भारतीय पथकात, प्रामुख्याने राजपूत रेजिमेंटमधील तुकडीसह इतर सशस्त्र आणि सेवा दलांतील 90 सैनिकांचा समावेश आहे. भारतीय नौदल तसेच भारतीय हवाई दल यांतील निरीक्षक देखील या सरावाचा भाग असतील. फ्रान्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुकडीत मुख्यतः 13 व्या फॉरीन लेजिन हाफ ब्रिगेड (13 वी डीबीएलई) मधील सैनिकांसह एकूण 90 सैनिकांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीतील आठव्या विभागातील नियमांनुसार, उप-परंपरागत परीदृश्यात बहु-आयामी कारवाई हाती घेण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमतांमध्ये वाढ करणे हे शक्ती या सरावाचे उद्दिष्ट आहे. या संयुक्त सरावादरम्यान निम-शहरी आणि डोंगराळ प्रदेशातील कारवाई यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या संयुक्त प्रशिक्षणादरम्यान उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, लढाऊ डावपेचांच्या पातळीवरील कारवायांसाठी ड्रिलचा सराव तसेच त्यात सुधारणा करणे तसेच परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे इत्यादी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
या सरावादरम्यान अभ्यासण्यात येणाऱ्या डावपेचांच्या ड्रिलमध्ये विशिष्ट प्रदेशावर कब्जा करण्याच्या दहशतवादी कृतीसंदर्भात कारवाई, संयुक्त कमांड चौकीची स्थापना, गुप्तचर आणि टेहळणी केंद्राची स्थापना, हेलीपॅड/विमाने उतरण्याची स्थळे सुरक्षित करणे, लहान पथकाचा शिरकाव आणि बहिर्गमन, हेलिकॉप्टरद्वारे केल्या जाणाऱ्या विशेष हवाई कारवाया, वेध आणि शोध मोहिमांसह ड्रोन तसेच ड्रोनविरोधी आणि इतर अनेक यंत्रणांचा समावेश आहे.
शक्ती सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला संयुक्त कारवायांच्या अंमलबजावणीसाठीच्या लष्करी डावपेचांतील सर्वोत्तम पद्धती, तंत्रे आणि प्रक्रिया सामायिक करणे शक्य होईल. या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांतील सैनिकांमध्ये आंतर परिचालनक्षमता तसेच परस्परांविषयी सद्भाव आणि सौहार्द विकसित करण्यात सुलभता प्राप्त होईल. यातून संरक्षणविषयक सहकार्याच्या पातळीत वाढ होऊन, भारत आणि फ्रान्स या मित्रदेशांच्या दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधाना अधिक चालना मिळेल.