नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर – शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हीच आमची भूमिका आहे. यासाठी मुंबईत बैठक घेऊन योग्य मार्ग काढू असे आश्वासन ना. सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी याना दिले. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी गेल्या चार दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यलयाबाहेर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला ना. सतेज पाटील यांनी भेट दिली.
महावितरणच्या कार्यालयातील सावळा गोंधळ थांबवा, शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाचा वीजपुरवठा सुरू करा या मागणीसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज ना. सतेज पाटील यांनी सुरु असलेल्या आंदोलणाला भेट दिली. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची भूमिका आमची असून यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढू, शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन असून शेट्टी यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे सांगितले.
दरम्यान, ना. हसन मुश्रीफ यांनीही आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, सचिव आणि उर्जा मंत्री नीतीन राऊत यांचेसोबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र, महापुराच्या काळातील राज्य शासनासोबतच्या बैठकीचा अनुभव चांगला न आल्याने जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे पाणी आणि विजेचा अपव्यय होतो. रात्रीच्या वेळी संपासह अनेक वन्यप्राणी येत असतात, त्यांच्यापासून शेतकऱ्यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे रात्रीचा वीज पुरवठा नकोच अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांच्याकडे केली.