नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आज सकाळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राजस्थान राज्यातील 33 खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी राजस्थानमध्ये अतिरिक्त 18 खेलो इंडिया केंद्रांसह समर्पित क्रीडा विज्ञान केंद्र असलेले राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल, अशी घोषणा केली, त्यामुळे राज्यातील खेलो इंडिया केंद्रांची एकूण संख्या 51 वर गेली आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “सर्व राज्यांनी क्रीडा प्रकारात प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे. जेव्हा राज्य सरकारे केंद्र सरकारच्या बरोबरीने सामायिक दृष्टिकोनासह क्रीडा क्षेत्रासाठी काम करतील तेव्हा भारताच्या खात्यात आणखी पदके येतील..
“खेलो इंडिया योजना तसेच टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेच्या यशामुळे गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर , मग ते ऑलिम्पिक असो किंवा पॅरालिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धा असो किंवा थॉमस चषक जिंकण्यासारखी ऐतिहासिक स्पर्धा असो, पदकांची संख्या वाढली आहे. अंतीम पंघलनेही दोनदा 20 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेची विश्वविजेता बनून इतिहास रचला. बुद्धिबळातही प्रज्ञानानंदने फिडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. भारतीय खेळांसाठी हा आश्चर्यकारक टप्पा आहे. 60 वर्षांत, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ 18 पदके होती. या वर्षी आपण स्पर्धेत 26 पदके जिंकली आहेत.”
खेलो इंडियाचे महत्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले,” या सर्व यशामध्ये खेलो इंडिया स्पर्धेची मोठी भूमिका आहे. दरवर्षी, अनेक खेळाडू युवा, विद्यापीठ आणि हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि त्यातील त्यांची कामगिरी त्यांना मोठ्या स्पर्धांकडे घेऊन जात आहे. मला आशा आहे की या खेलो इंडिया केंद्रांद्वारे, राजस्थानमधील अधिकाधिक खेळाडू इथे तयार होतील. आजी आणि माजी खेळाडूही या केंद्राचा लाभ होत आहे.”