नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – “घरोघरी तिरंगा” या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी होऊन दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिका मुख्यालयातील ध्वज विक्री केंद्राचा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.
महापालिकेकडे आता 2 लाख ध्वज प्राप्त झाले असून आज सुमारे 1 लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत हे ध्वज केवळ रु.9/- येवढया अल्प किंमतीत महापालिकेकडून उपलब्ध होणार आहेत. महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात तसेच सर्व प्रभागांमध्ये ध्वज विक्री साठी उपलब्ध राहणार असून त्या विक्री केंद्रातून नागरिकांना ध्वज विकत घेता येतील. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील स्वस्त धान्यांच्या दुकानात आणि महापालिका कर्मचा-यांमार्फत तसेच बीएलओमार्फत घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वितरण आणि विक्री केली जाणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.दांगडे यांनी दिली.
तसेच दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हे राष्ट्रध्वज कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात डौलाने फडकतील असा विश्वास व्यक्त करत आयुक्तांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या समयी उपआयुक्त सुधाकर जगताप, परिमंडळ 1 चे उपआयुक्त धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, उपआयुक्त अर्चना दिवे, वंदना गुळवे, पल्लवी भागवत, अतुल पाटील तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तिरंगा फडकविण्याबाबत मार्गदर्शक सूचना
# केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय/ सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्र ध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.
महानगरपालिकेकडून तिरंगा सशुल्क मात्र अल्प किंमतीत उपलब्ध होणार असून नागरिकांनी काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करून झेंडा उभारणे अपेक्षित आहे.
# तिरंगा फडकवताना केशरी रंग नेहमी वर असेल याची दक्षता घ्यावी.
# तिरंगा ज्या खांबाच्या आधारे फडकवण्यात येतो, त्यावर कोणताही दुसरा ध्वज तिरंग्या सोबत फडकवू नये
# ईमारतीच्या आवारात दोन किंवा जास्त असतील तर तिरंगा हा इतर ध्वजापेक्षा जास्त उंचीवर असेल याची दक्षता
# प्रत्येक नागरिकाने ध्वजसंहितेचे पालन करावे.
तिरंगा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
# अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला तिरंगा कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये.
# तिरंगा अर्ध्यावर फडकवण्यात येऊ नये. हातरूमाल, पंचे यावर तिरंगा छापू नये. तिरंगा हा कोणत्याही पोशाखाचा भाग असू नये. तिरंग्यावर काहीही लिहिण्यात येऊ नये, तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुडाळण्यासाठी करू नये.
# गाडया, बोटी, रेल्वे यांना झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर होऊ नये.
# तिरंगा मातीती अथवा पाण्यात पडू नये, तिरंग्याचा वापर जाहिरातीसाठी होऊ नये.
# कार्यक्रमानंतर तिरंगा काळजीपूर्वक ठेवणे आवश्यक आहे तो तिरंगा मळेल किवा खराब होईल किंवा त्याचा अपमान होईल अशा प्रकारे ठेवू नये.
# दि. १३ ऑगस्ट २०१२ ते १५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत घरो घरी तिरंगा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले ध्वज अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
# घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी तिरंगा खाली उतरावयाची आवश्यकता नाही कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.