महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image अर्थसत्ता चर्चेची बातमी

भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमामध्ये सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. या प्रसंगी, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालय हे सीसीआयचे तिसरे विभागीय कार्यालय आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये चेन्नई येथे सीसीआयच्या दक्षिण विभागीय कार्यालयाचे तर एप्रिल 2022 मध्ये कोलकाता येथे पूर्व विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मुंबई येथे विभागीय कार्यालयाची सुरुवात केल्याबद्दल सीसीआयचे अभिनंदन केले आणि त्या म्हणाल्या की, व्यापार करण्यातील सुलभता आणखी वाढविण्यासाठी सीसीआय ही संस्था व्यापार समूहांशी सोप्या पद्धतीने जोडली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. सीसीआयने त्यांच्या सल्लागार पत्रिका विविध भाषांमध्ये प्रकाशित केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सीसीआयची प्रशंसा केली आणि त्यापुढे म्हणाल्या की अशा उपक्रमांमुळे सामान्य लोक नियामकापर्यंत पोहोचण्यास अधिक सक्षम होतात. अत्यंत वेगाने उदयाला येणाऱ्या डिजिटल बाजारांबद्दल बोलताना सीतारामन यांनी जागतिक पातळीवर सर्वोत्तम प्रक्रियांसाठी मानके निश्चित करून अशा बाजारांतील व्यवहारांच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या स्पर्धात्मक समस्या सोडविण्याच्या गरजेवर सीतारामन यांनी भर दिला. केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, सक्रियपणे कार्य करणारी सीसीआय ही संस्था मदतीसाठी येणाऱ्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण करते तसेच समस्या हाताबाहेर जाण्याच्या कितीतरी आधीच लोकांना मदत करते.

या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यानी “कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया – अ जर्नी थ्रू द इयर्स, 2009 – 2022” या शीर्षकाच्या सचित्र ई-पुस्तकाचे प्रकाशन देखील केले. या पुस्तकामध्ये सीसीआयच्या घडणीच्या वर्षांचे वर्णन आहे तसेच या काळात आकार घेण्यासाठी संस्थेला सहाय्यकारी ठरलेल्या विविध उपाययोजना, कार्यक्रम आणि कारवायांचा त्यात आढावा घेतलेला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सीसीआयच्या उर्दू तसेच पंजाबी भाषेत भाषांतरित करण्यात आलेल्या स्पर्धा सल्लागार पुस्तिकांचे देखील अनावरण केले. या पुस्तिकांमध्ये- सीसीआयकडे माहिती कशी दाखल करावी, कार्टेल्स, बिड रिगिंग, अब्युज ऑफ डॉमिनन्स, कॉम्बीनेशन्स, लिनीयंसी इत्यादी विषयांवर उपयुक्त माहिती दिली आहे. उर्दू आणि पंजाबी भाषेखेरीज ही पुस्तिका याआधी तेलुगु, बंगाली, मराठी, तमिळ, मल्याळम, कन्नड, आसामी, गुजराती, ओडिया, हिंदी आणि इंग्रजी या 11 इतर भाषांमध्ये देखील भाषांतरित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×