नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारकडून अतिशय भरीव असे काम करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. कल्याणजवळील कांबा येथे बिट्स पिलानी शिक्षण संस्थेच्या मुंबई कॅम्पसचे अर्थमंत्री सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
2014 मध्ये देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून दरवर्षी एक नवीन IIT/IIM उघडले जात आहे, भारतात दर आठवड्याला 1 नवीन विद्यापीठ बांधले जात आहे, दर तिसऱ्या दिवशी 1 अटल टिंकरिंग लॅब उघडली जाते – प्रत्येक दुसऱ्या दिवशी 1 नवीन महाविद्यालय बांधले जात आहे, दररोज 1 नवीन ITI तयार होत आहे आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत आतापर्यंत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची आकडेवारी त्यांनी यावेळी जाहीर केली.
या सर्व बाबींचा विचार करता भारतात शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकार किती मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच या सर्वांची केवळ घोषणा करून आम्ही थांबत नाहीये तर अर्थसंकल्पातही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची खबरदारीही सरकार घेत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
त्यासोबतच केंद्र सरकार विविध देशांसोबत शैक्षणिक पात्रता (MRA) फ्रेमवर्कच्या आखणीसाठीही सक्रीय पाठबळ देत असून त्यामूळे सामंजस्य कराराद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात घेणे शक्य होईल. आम्ही अलीकडच्या काळात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि यूएई या देशांसह अनेक द्विपक्षीय सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षरी केली आहे. आणि इतर अनेक देशही या वाटाघाटी प्रक्रियेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ (बिट्स-पिलानी) च्या कल्याण तालुक्यातील कांबा येथे उभारण्यात आलेले भव्य बी-स्कूल हे ठाणे जिल्ह्याबरोबरच मुंबई महानगर प्रदेशासाठी भूषण ठरणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, उद्योगपती आणि बिट्स-पिलानीचे कुलपती कुमार मंगलम बिर्ला, पद्यभूषण राजश्री बिर्ला, नीरजा बिर्ला यांचीही उपस्थिती होती.