नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात दिनांक 27, 28 व 29 जानेवारी, 2023 रोजी औरंगाबाद येथील बिडकीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर येथे होणार आहे. या समागमाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवारी झाला असून त्याचे विधिवत उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रांच प्रशासन मेंबर इंचार्ज मोहन छाब्रा यांच्याहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारोहाची सुरवात सद्गुरु माता जी व निरंकार प्रभुचरणी हा समागम यशस्वीरित्या पार पडावा या हेतुने प्रार्थना व नमन या रुपात करण्यात आला. या सोहळ्यामध्ये दिल्लीहून संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा यांच्यासह समागम समितीचे चेअरमन, समन्वयक, अन्य सदस्य तसेच महाराष्ट्रातील विविध झोनचे प्रभारी आणि सेवादलचे क्षेत्रीय संचालक व अन्य अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद तसेच आजुबाजुच्या परिसरातून आणि मुंबई व महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण या उद्घाटन समारोहामध्ये सहभागी झाले होते.
यापूर्वी महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमांची श्रृंखला सन 2019 पर्यंत मुंबई महानगर परिक्षेत्रातच आयोजित होत आली. जानेवारी, 2020 मध्ये 53वा समागम प्रथमच मुंबईबाहेर नाशिकमध्ये आयोजित केला गेला आणि त्यानंतर दोन वर्षे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2 संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आले जे समस्त भक्तगणांनी प्रभू इच्छा समजून गोड मानून घेतले आणि घरबसल्याच त्या समागमांचा आनंद प्राप्त केला. आनंदाची हीच दिव्य अनुभूती पुनश्च जागृत करण्याच्या हेतुने यावर्षी 56वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्य-दिव्य रुपात औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात येत आहे ज्याचे संपूर्ण निरंकारी जगत साक्षी होईल.
सद्गुरु माताजींच्या पावन अध्यक्षतेखाली आयोजित होत असलेल्या या दिव्य संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक-भक्तगण सहभागी होणार आहेत. समागम स्थळावर दररोज अनेक महात्मा, सेवादलचे महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण आपल्या सेवा प्रदान करणार आहेत. भक्तगणांच्या निष्काम सेवांद्वारे समागम स्थळ एका सुंदर शामियान्यांच्या नगरीमध्ये परिवर्तित झालेले दिसेल ज्यामध्ये भक्तांच्या निवासाची व्यवस्था, जलपान व अन्य मुलभूत व्यवस्था प्रशासन व अधिकाऱ्यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे. त्याबरोबरच समागम स्थळावर विविध प्रबंध कार्यालये, प्रकाशन स्टॉल, प्रदर्शनी, लंगर, कॅन्टीन आणि डिस्पेन्सरी इत्यादि सुविधा आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत.