नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – देशभरात दररोज फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. तुमच्या एका चुकीकडे फसवणूक करणारे डोळा लावून असतात जेणेकरून ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतील. एटीएम चा वापर आता सगळेच करताना दिसतात. पण बऱ्याच लोकांना एटीएम ऑपरेट करता येत नाही,आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरटे हातचलाखीने त्यांना लुबाडतात.
कल्याणात एटीएम सेंटरमध्ये येणाऱ्या सर्व नागरीकांचे पीन नंबर आणि एटीएम घेऊन अनेकांना लुटणारा सराईत चोरटा दीपक झा याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात आरोपीने एकूण १६ नागरीकांना आपले लक्ष्य बनविले.पोलिसांनी आरोपीकडून विविध बँकांचे ९२ एटीएम कार्ड आणि २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून दीपक झा याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने किती लोकांना गंडा घातला असेल याचा अंदाज लागू शकतो.
काही दिवसापूर्वी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार केली. त्या दोघींची तक्रार एकच होती. त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या. त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला. पैसे निघाले नाही. थाेड्याच वेळात महिलेच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली. पोलिसांच्या मते आरोपी दीपक झा हा एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात एटीएम सेंटरमध्ये येणारे नागरिक ज्यांना एटीएम ऑपरेट करता येत नाही. असे नागरीक जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यास जात असे तेव्हा मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे. पीन कोड काय टाकला जात आहे ते पाहायचे. नंतर परत आत जाऊन हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. दुसरा एटीएम कार्ड त्या नागरीकांच्या हाती द्यायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढण्याचे नाटक करायचे. पैसे निघत नसल्याने नागरीक घरी जायचे. त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरिजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे.
पोलिसांना ही तक्रार आल्यानंतर डीपीसी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपास सुरु असतानाच पोलिसांकडे या प्रकरणी १६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला तेव्हा त्यात दोन तरुण कैद झाले होते. अखेर त्या पैकी एक दीपक झा याला पोलिसांनी उल्हासनगरातून अटक केली. आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.