कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार गेल्या ५ दिवसापासून महापालिका क्षेत्रात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शहानिशा करून त्यांची अँन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या महापालिकेच्या प्रभाग क्षेत्रातील सुमारे ६२५ नागरिकांची अँन्टीजन टेस्ट केली असता त्यामध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असून एक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करायच्या सूचना महापालिकेमार्फत वारंवार देण्यात येऊनही अजून काही ठिकाणी नागरिक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. बुधवारी अशा विनामास्क फिरणाऱ्या १३० नागरिकांना महापालिकाच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी, पोलिसांच्या मदतीने ६५ हजार रुपये इतका दंड आकारला आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी फिरताना न चुकता मास्क परिधान करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.