कल्याण/प्रतिनिधी – पहिल्या पावसाला आपल्याकडे सर्वच वर्गामध्ये एक वेगळे असे महत्व आहे. ‘पहिला पाऊस..पहिली आठवण’ लहाना पासून ते वृद्धा पर्येंत सर्वच आपल्या वेग वेगळ्या आठवणी अनुभव एकमेकांना सांगत असतात पण गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवलीकरांसाठी पहिला पाऊस म्हणजे ‘तुंबलेली गटारे आणि रस्त्यावर साचलेले पाणी’ हीच काय ती आठवण बनत चालली आहे.एकीकडे हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे मान्सूनच्या पावसाचे म्हणजे पहिल्या पावसाचेही आज आगमन झाले.
पहाटेपासूनच पावसाने जोरदार एंट्री करत कल्याण डोंबिवलीकरांना आपल्या आगमनाची दखल घेण्यास भाग पडले. परिणामी कल्याण डोंबिवलीतील नेहमीच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावेळीही पाणी साचलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी घरात तर काही ठिकाणी दुकानांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्याजोडीला महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्याबाबतही नागरिकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालिकेच्या नावाने प्रश्नाचा भडीमार झाला खरच पालिका नाले सफाई करते क? नालेसफाई हा दिखावा आहे का? वगैरे वैगेरे. सकाळी 12 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये 83.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, एमआयडीसी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले. तर आज सकाळी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात सोसायटीच्या संरक्षक भिंतींचा भाग कोसळला.