नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – मागील काही दिवसात कल्याण कोळसेवाडी परिसरात महिलांवरील अत्याचार वाढले असून लहान मुलींची छेडछाड, बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, कोचिंग क्लासेसनी क्लासच्या वेळा रात्रीच्या ठेऊ नयेत, कोचिंग क्लास बाहेर बॉडीगार्ड नेमावेत आणि घडलेली घटना नेमकी का घडली? त्यांच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? यांचा सखोल तपास करत त्याचा अहवला सादर करावा अशा सूचना महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिसांना दिल्या आहेत. कल्याण कोळसेवाडी परिसरात अल्पवयीन तरुणीवर चाकूने वार करत तिच्या आई समोर तिची तिच्या दारातच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आढावा घेत छाब्रिया यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेत पोलिसांना सूचना दिल्या. या वेळी महिलांवरील अत्याचार, लहान मुलींची छेडछाड, हत्या, बलात्काराचा प्रयत्न यांसारखे प्रकार गंभीर असून हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी उपाययोजना केली जाणे गरजेचे आहे. अन्यथा बालविवाह पुन्हा एकदा वाढीस लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.