नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जुना जालना भागातील गोकुळ नगरी, वृंदावन कॉलनी, भाग्यनगर सह संपूर्ण जुन्या जालन्यामध्ये वीजपुरवठा अचानक खंडित होत आहे. त्याचा त्रास सामान्य नागरिकांच्या सोबतच विद्यार्थ्यांनाही सोसावा लागत आहे. ज्या वेळेला नळाला पाणी येते त्या वेळेला लाईट राहत नाही आणि ज्या वेळेला लाईट असतात त्यावेळी पाण्याचा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे महिलांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने जुना जालना भागातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत महावितरणाच्या अभियंतांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी टाळ चिपळ्यांचा गजर करण्यात आला. आमच्या मागण्यांवर योग्य विचार येणाऱ्या तीन ते चार दिवसात न झाल्यास यापुढे महिला लाटणे घेऊन उभे राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. सध्या श्रावण मास चालू असून पहाटे मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि महिलांची मोठी वर्दळ असते, पहाटे वीज जात असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
याशिवाय अनेक शासकीय कार्यालय, रुग्णालय, महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारावर याचा परिणाम होत आहे. विजेची ही गंभीर समस्या तात्काळ लवकरात लवकर सोडण्याचे एक निवेदन नागरिकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयास देण्यात आले आहे. यावेळी महावितरणच्या विरोधात नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.नागरिकांनी यावेळी या भागातील रस्त्याचाही प्रश्न माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडे उपस्थित केला व यावर आवाज उठवण्याची मागणी केली.