नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नागपूर शहरातील एका तरुण दाम्पत्याने केवळ चार बाय चारच्या एका बंद खोलीत चक्क ‘केशर’ ची शेती फुलवली आहे. अवघ्या पाच महिन्यात या केशर शेतीच्या माध्यमातून या तरुण दाम्पत्याला तब्बल ८ लाख रुपये किमतीच्या दीड ते दोन किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे. सध्या तीन महिन्याच्या कालावधीत अर्धा किलो केशरचं उत्पादन देखील त्यांनी प्राप्त केले आहे. केवळ एकदाचं गुंतवणूक करून या दाम्पत्याला आता दरवर्षी किमान आठ ते दहा लाखांचा निव्वळ नफा हा पुढील पाच ते सात वर्षांसाठी निश्चित झाला आहे. दिव्या आणि अक्षय होले असं या तरुण व प्रयोगशील दाम्पत्याचं नाव आहे. दिव्या बँकेत अधिकारी आहे. तर अक्षय यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. दोघांना शेतकरी आणि शेतीच्या बाबतीत प्रचंड ओढ आहे. आई वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना कायम शेतीच्या क्षेत्रात काहीतरी नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा होती. अश्यातचं त्यांना इंटरनेटवर केशर शेतीच्या या प्रयोगाची माहिती समजली, त्यांनंतर केशर शेतीच्या बाबतीत अधिकची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. केशरची शेती आपल्या घरात देखील करता येते ही संकल्पना समजल्यानंतर दिव्या आणि अक्षय यांनी थेट काश्मीरच्या पंपोर येथे जाऊन यासंदर्भात माहिती घेतली आणि सुरू झाला त्यांचा केशर शेतीचा प्रयोग.
आपल्या देशात केशराचे उत्पादन हे उत्तरेकडील थंड राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्येचं होते. केशरची शेती करण्यासाठी वातावरण फार थंड असावं लागतं. मात्र, आता ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या अति उष्ण नागपुरात देखील केशर शेती शक्य झाली आहे. एरोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने बंद खोलीत केशर लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी एरोपोनिक्स तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रण करून शेती केली जाते. यात माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही. कमी वेळेत अगदी लाखोंचे उत्पादन मिळवून देणाऱ्या या नव्या आणि वेगळ्या प्रयोगला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असे म्हणतात.
विदर्भातील पिकांना कधी उष्ण वातावरणाचा फटका बसतो तर कधी अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी होते. त्यामुळे परिणामी हवालदिल शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या सारखे टोकाचं पाऊल उचलतात. शेतीला जोड धंदा म्हणून आजचे तरुण व शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत असले तरी अपेक्षित यश मिळतं नसल्याने ते देखील हताश, निराश होऊ लागले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांच्या बद्दल मनात तळमळ असलेल्या एका तरुण दाम्पत्याने तब्बल दीड-दोन वर्ष अभ्यास करुन चक्क चार बाय चारच्या एका बंद खोलीत ‘केशर’ची शेती फुलवली आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भातील वातावरण देखील अवघ्या पाच महिन्यांत केशर पीक लाखो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळवून देईल, त्यामुळे ही केसर शेती प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवन ठरणार आहे.