नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुलुंड/प्रतिनिधी – मुंबई ,ठाणे मतदारसंघात पाचव्या टप्यात होणारी लोकसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरात राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा होत आहे. तसेच नेत्यांच्या रॅलीमुळे ठिकठिकाणी पोलिस डोळ्यात तेल घालून पहारा देत असल्याचे चित्र आहे. कारण अशा वातावरणात अनेकदा कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता असते.
मुलुंडमध्ये १७ मे रोजी रात्रीच्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बीजेपी वर गंभीर आरोप केले गेले. बीजेपीच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू असल्याचे आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले. ज्यामुळे मुलुंड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावर नागरीक जमा झाले. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाटी चार्ज देखील करण्यात आला. मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन तपास कार्य सुरू केले. यानंतर थोडयाच वेळात परिसरातील वातावरण शांत झाले.