कल्याण/प्रतिनिधी – गंभीर करोना रुग्णांना उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधाचे दुष्परीनाम रुग्णावर होत असून करोना नंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराने कल्याण डोंबिवलीत दोन बळी घेतले आहेत. ठाणे ग्रामीण मधील म्हारळ भागातील ३८ वर्षीय तरूणाबरोबरच डोंबिवली पूर्वेकडील एका ६९ वर्षीय नागरिकाचा म्युकरमायकोसीस आजाराने मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु होते. दरम्यान अद्यापि या आजाराचे ६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस (Mucormycosis) हा आजार आढळून येत आहे .म्यूकरमायकोसीस हा संधीसाधू संसर्गाचा (opportunistic infection) प्रकार असून तो एक प्रकारच्या बुरशी (Fungus)पासून होतो. सदर आजार हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी असलेल्या विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्याच्या आजूबाजूला दुखणे व डोळा लालसर होणे ,ताप,डोकेदुखी खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताची उलटी होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.किडनी ट्रान्सप्लांट / कॅन्सर इ. आजारामुळे रोग प्रतिकार शक्ती कमी झालेले रुग्ण अशा रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. सध्यास्थितीत कोविड आजारामुळे उपचारासाठी स्टेरॉईडस आणि इतर इम्युनिटी कमी करणारी औषधे जास्त प्रमाणात वापरले आहेत. तसेच ICU मध्ये जास्त काळ दाखल रहावे लागत आहे, त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.
तरी कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी घाबरून न जाता वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे मार्फत करण्यात येत आहे