गोंदिया/प्रतिनिधी – वाहतुकीचे नियम तोडून बेशिस्तपणे वाहतूक केल्यामुळे देशात रोज हजारो अपघात होतात. यात अनेक निष्पाप लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. वाहतुकीचे नियम तोडने, गाड्यांमध्ये रेस लावणे आणि स्टंट करण्यात तरुण पिढीला मनोरंजण वाटते. पण हेच कुणाचातरी बळी घेऊ शकते याचा ते थोडा देखील विचार करत नाही. वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात पोलीस प्रशासन वेळोवेळी मार्गदर्शन आणि गरज पडल्यास कारवाई देखील करते. तरीही वाहतुकीचे नियम सररासपणे मोडण्यात येतात. पुण्यातील हाय प्रोफाईल प्रकरण वेदांत अग्रवालने तर पूर्ण देशात खळबळ माजवली आहे.
‘अति घाई अन् संकटात नेई’ अशीच स्थिती सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अपघाताची संख्या सुद्धा वाढत आहे. ही एक चिंतेचे बाब आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या जानेवारी ते एप्रिल या 120 दिवसात 98 अपघात झाले आहे. तर यात तब्बल 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केले आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.