प्रतिनिधी.
डोंबिवली – मध्यप्रदेश राज्यामधील इंदौरमधून गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या 40 वर्षीय इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. नरेंद्र रामप्रसाद कौशल असे या आरोपीचे नाव आहे.
लॉकडाऊनमध्ये पैशाच्या कमरतेमुळे मध्यप्रदेशमधील तरुण गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवलीत आला होता. उल्हासनगर 5 मधील बंटी नावाच्या व्यक्तीला हा कट्टा विकण्यासाठी आपण आल्याची माहिती नरेंद्र याने पोलिसांना दिली.
ठाणे पोलीस आयुक्त परिसरात विनापरवाना लाठ्या-काठ्या किंवा कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आलेली असताना हा मनाई आदेश झुगारून नरेंद्र शुक्रवारी रात्री साडेआठच्या वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याची माहिती पोलीस नाईक चंद्रकात शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता नरेंद्र हा स्टेशनजवळ ग्राहकाची वाट पाहत थांबल्याचे आढळून आले. त्याच्याकडून पोलिसांनी काडतुसेविरहीत कट्टा हस्तगत केला आहे. चौकशीत त्याने लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळेच हा कट्टा विकण्यासाठी इथपर्यत आल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान ग्राहक बंटी याचा पोलीस शोध घेत असून जमिनीच्या वाद असल्याने त्याला हा गावठी कट्टा हवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. कल्याण कोर्टाने आरोपी नरेंद्र कौशल याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.