महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य ताज्या घडामोडी

आयएमए कल्याणच्या ये दिल क्या करे परिसंवादाने जिंकली प्रेक्षकांची मने

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – सध्या लहान वयातच अनेकांना विविध शारिरीक आजारांचा सामना करावा लागत असून निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीत बदल करण्यासह अध्यात्माची जोड देणंही आवश्यक असल्याचे मत तज्ञ डॉक्टर्स आणि नामवंत कलाकारांनी परिसंवादात व्यक्त केले. निमित्त होते ते इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या 30 व्या वार्षिक परिषदेतील ‘ये दिल क्या करे’ या आरोग्य विषयक परिसंवादाचे.पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या प्रमूख उपस्थितीत या 2 दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. कोवीडनंतर बदललेल्या आरोग्य व्यवस्थेचा चेहरा, येणाऱ्या काळातील आवाहने, वैद्यकीय क्षेत्रातील नवनविन तंत्रज्ञान आदी विषयांवर तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत या अधिवेशनात उहापोह करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कोवीड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनाही कृष्णप्रकाश यांच्या हस्ते गौरवण्यात आले.तर लाईफस्टाईल कार्यक्रमांतर्गत झालेल्या परिसंवादात ज्यूपिटर रुग्णालयाचे वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन बुरकुले, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. योगेश गोडगे, डायबेटोलॉजिस्ट डॉ. नितीन पाटणकर यांच्यासह कॅन्सरसारख्या आजाराला यशस्वी मात देणारे अभिनेते शरद पोंक्षे आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये सहभागी झाले होते. अभिनेत्री श्वेता पेंडसे यांनी या वक्त्यांशी संवाद साधला. आरोग्याच्या धाग्यांची वीण ऍलोपथी आणि अध्यात्माच्या माध्यमातून कशाप्रकारे घट्ट बांधू शकतो याचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

रामदास स्वामींनी दासबोधामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे चांगले ठेऊ शकतो ही बाब कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी दासबोधातील दाखल्यांसह स्पष्ट केली. तसेच सध्याचे वातावरण पाहता आपण सकारात्मकता हरवून बसलो असून ती पुन्हा मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचेही लिमये म्हणाले.इतर गोष्टींप्रमाणे आपण आपल्या शरीरासाठीच वेळ देत नसल्यामुळेच सर्व बिघडत चालल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या उपचारांवर विश्वास नव्हे तर श्रद्धा असली पाहीजे आणि ती नसेल तर डॉक्टर बदला असा सल्ला दिला. तसेच आपल्या आयुष्यात काही तरी ध्येय असणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात ते होते म्हणूनच त्याच्या साथीनेच आपण कॅन्सरसारख्या आजारावर मात केल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.

तर सध्याच्या काळात हृदयविकार, कॅन्सर, स्ट्रोक, डायबेटीससारखे गंभीर आजार कमी वयातच होताना दिसत आहेत. या सर्व आजारपणांसाठी आपली सध्याची बदललेली लाईफस्टाईल कारणीभूत असून त्यातून बाहेर पडणे खूप आवश्यक असल्याचे मत या तज्ञ डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या आजारांना कशाप्रकारे आपण अटकाव करू शकतो किंवा त्यांनी गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच त्यांची लक्षणे ओळखून काय पाऊले उचलली पाहिजेत याची माहिती कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन बुरकुले, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. योगेश गोडगे, डायबेटोलॉजिस्ट डॉ. नितीन पाटणकर यांनी यावेळी दिली. तसेच सध्या या आजारांची इतकी वाढती रुग्णसंख्या पाहता इच्छा असूनही आम्ही पेशंटसाठी आवश्यक तो वेळ देऊ शकत नसल्याची खंतही या डॉक्टरांनी व्यक्त केली. या परिसंवादाने प्रेक्षकाची मने जिंकून घेतली. हा कार्यक्रम संपूच नये असे प्रेक्षकांना वाटत असल्याचे प्रेक्षकांनी बोलून दाखवले.

या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजेश राघवराजू, सचिव डॉ. इशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर, डॉ. अमित बोटकुंडले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या सदस्यांसह संमेलनाध्यक्ष डॉ. राजेश राघवराजू यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

कोवीडमूळे दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या या अधिवेशनाला विविध मान्यवरांसह ठाणे आणि मुंबईतील 450 तज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. शासनाने लागू केलेल्या कोवीड नियमांचे या अधिवेशनात काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×