नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडी किनार्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी जागेवर अवैधरित्या भराव सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. मात्र, याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल असं कल्याण तहसील विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव मानकोली पुलाला लागून असलेल्या खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी जागेवर भराव सुरू आहे. या भराव कोणाकडून सुरू आहे, या संदर्भात कोणतीही माहिती नाही. परंतु डंपरच्या सहाय्याने माती टाकली जात आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक राजेश भोईर यांनी वारंवार तक्रार केली असून याकडे कोणीही लक्ष देत नाही. शासकीय जागेवर अतिक्रमण केल जात आहे, याकडे प्रशासन का लक्ष देत नाही? असा आरोप भोईर यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात कल्याण तहसील विभागाचा नायब तहसीलदार कौशल्य राणी पाटील यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई केली जाईल.