नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
गोवा/प्रतिनिधी – इफ्फी-53 प्रसिद्ध फ्रेंच-स्विस चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट समीक्षक जीन-लुक गोडार्ड यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे आणि या दिग्गज चित्रपट कर्मीने बनवलेल्या काही अनमोल चित्रपटांचा नजराणा हे यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा आकर्षण बिंदू ठरणार आहे.
आशियामधल्या या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचं यंदाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, फ्रान्सला फोकस कंट्री बनवण्यात आलं असून (केंद्रस्थानी ठेवून), यामध्ये फ्रेंच चित्रपटांचा उत्सव साजरा होणार आहे, आणि गोडार्ड हे निःसंशयपणे, फ्रेंच सिनेमावर आपला ठसा उमटवणारं एक व्यक्तिमत्त्व आहे! फ्रँकोइस ट्रुफॉट, अॅग्नेस वर्दा, एरिक रोहमर आणि जॅक डेमी यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत 1960 च्या फ्रेंच न्यू वेव्ह चित्रपट चळवळीचे प्रणेते म्हणून गोडार्ड प्रकाशझोतात आले. युद्धोत्तर काळातील ते सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्माते होते.
चित्रपट समीक्षक म्हणून आपल्या उमेदवारीच्या काळात, कॅहियर्स डु सिनेमा या प्रभावशाली मासिकासाठी चित्रपट समीक्षक म्हणून काम करताना, गोडार्ड यांनी मुख्य प्रवाहातील फ्रेंच सिनेमाच्या ‘दर्जाच्या परंपरे’वर टीका केली, आणि नवोन्मेष आणि प्रयोगशीलतेवर भर दिला. प्रत्युत्तर म्हणून, त्यांनी आणि त्यांच्या समविचारी समीक्षकांनी फ्रेंच सिनेमांसह पारंपरिक हॉलीवूड चित्रपटांच्या परंपरांना आव्हान देणारे चित्रपट स्वतः बनवायला सुरुवात केली. त्याचं काम चित्रपट इतिहातील संदर्भांचा वारंवार वापर करून, त्यांचा आदर करते तसंच आपला राजकीय दृष्टीकोन प्रदर्शित करतं. यंदाच्या वर्षी 13 सप्टेंबर रोजी जगाने हे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व गमावले.