नेशन न्यूज मराठी टिम.
धुळे/प्रतिनिधी – राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात. यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. अशातच महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.
आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित म्हणाले, “मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकणा दिसू शकतो. त्याचबरोबर नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे. ती बेंगलोरची आहे. ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचं ऑइल असतं. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते.”
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला आदिवासी मंत्री विजय कुमार गावित देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजयकुमार गावित यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.