नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोवीडमूळे दोन वर्षांच्या काल खंडानंतर झालेल्या कल्याण पश्चिमेतील ‘ दिवाळी पहाट ‘ कार्यक्रमाला कल्याणकर रसिक श्रोत्यांनी तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील फाउंडेशन आणि कल्याण शहर भाजपतर्फे या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोवीडमुळे गेली दोन वर्षे सर्वांनाच प्रचंड ताण तणावात काढावी लागली. मात्र यंदा दहीहंडी उत्सवापासून राज्य सरकारकडून सर्वच निर्बंध उठवल्याने नागरिकांमध्ये आनंद आणि उत्सुकता होती. दहिहंडीला रचल्या गेलेल्या निर्बंध मुक्तीच्या पायावर दिपावलीच्या उत्साहाने कळस चढवल्याचे दिसून आले.

दीपावलीनिमित्ताने हजारो कल्याणकरांनी सूर व संगीताने मंतरलेली दिवाळी पहाट अनुभवली. भाजपा व कपिल पाटील फौंडेशनतर्फे साई चौकात आयोजित केलेल्या पाच तासांच्या रंगतदार कार्यक्रमात अविस्मरणीय गीते गुणगुणत तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही लावणीवर ठेका धरला. तर विनोदी चुटक्यांवर हास्यांचे फवारे उडाले. चित्रपटसृष्टीतील १३ कलाकारांचा अविष्कार व गायकांचा सूर ऐकून हजारो कल्याणकरांची यंदाची दिवाळी स्मरणीय ठरली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या दिवाळी पहाटमध्ये नागरिकांचा अपूर्व उत्साह व जोश पाहावयास मिळाला.
आघाडीचा गायक-गायिका अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, सावनी रविंद्र यांनी सादर केलेली गीते, अभिनेत्री अमृता खानविलकर व नृत्यांगना नेहा पेंडसे यांचे लावणीनृत्य, हास्य कलाकार गौरव मोरे, नम्रता संभेराव, वनिता खरात, श्याम राजपूत, चेतना भट यांचे विनोदी सादरीकरण आणि डान्स महाराष्ट्राची कलाकार तश्वी भोईर हिचे नृत्य रसिकांच्या पसंतीला उतरले.
अव्वल कलाकारांच्या उपस्थितीत सकाळी साडेपाच वाजता झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत केला. त्यानंतर सकाळी १० वाजता राज्यगीत जय जय महाराष्ट्र व राष्ट्रगीताने समारोप झाला.
या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, वरुण पाटील आदींची उपस्थिती होती.
कल्याणची सांस्कृतिक परंपरा वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी देवदिवाळीला दिपोत्सव साजरा केला जाईल. त्याचबरोबर दिवाळीसंध्या कार्यक्रमही सुरू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या कार्यक्रमात केली.