प्रतिनिधी.
कल्याण – कोरोना’ झाला म्हणून रक्ताची नातीही एकमेकांपासून दूर झाल्याचे अनेक दुर्दैवी प्रकार समोर आले असतानाच कल्याणातील एक हौसिंग सोसायटी मात्र कोरोना रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे सकारात्मक उदाहरण समोर झाले आहे.
नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या गोदरेज हिल परिसरात रोझाली एलएक्स नावाची ही हौसिंग सोसायटी आहे. 180 फ्लॅट्स आणि सुमारे 800 लोकं याठिकाणी राहत असून त्यांच्यासाठी ही केवळ हौसिंग सोसायटी नाही तर त्यांच्या कुटुंबाइतकीच ती महत्वाची किंवा जवळची आहे. आतापर्यंत या सोसायटीमध्ये तब्बल 35 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 82 आणि 80 वर्षांच्या आजी-आजोबांचाही समावेश होता. मात्र कोरोनाच्या या कठीण काळामध्ये या सोसायटीने एकमेकांची विशेषतः कोरोना रुग्णांची अक्षरशः एका कुटूंबप्रमुखाप्रमाणे काळजी घेतली. तर इथल्या 35 पैकी केवळ 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि बाकी सर्वांना सोसायटीमध्येच होम आयसोलेशनमध्ये योग्य उपचार आणि आवश्यक ती संपूर्ण मदत करण्यात आली. तीसुद्धा कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम कायदे पाळून आम्ही या सर्व गोष्टी केल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष राकेश पुरस्वानी आणि सेक्रेटरी सुनिल घेगडे यांनी दिली.विशेष म्हणजे कोरोनाच्या या कठीण काळात संपूर्ण सोसायटी सर्वच रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे आणि तितक्याच आपुलकीनेही उभी राहिली. ज्यातून आम्हा सर्वांना कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबासारखा मानसिक आधार मिळाला आणि आम्ही त्यातून लवकर बाहेर येऊ शकलो अशी प्रतिक्रिया एका महिला सदस्यानी दिली.
दरम्यान कोरोनामूळे एकीकडे जिथे सख्खी नाती एकमेकांपासून दुरावल्याचे चित्र असताना या हौसिंग सोसायटीने आणि तिथल्या सदस्यांनी एकमेकांना दिलेला मानसिक आधार, केलेली मदत याचे करावे तितके कौतुक कमीच होईल.