महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image मुख्य बातम्या मुंबई

उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव

प्रतिनिधी.

मुंबई – प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण केलेल्या सहा विभागांच्या अधिकाऱ्यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव करण्यात आला. यामध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गृह आणि पर्यावरण विभाग यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय (विभागून) आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. राजशिष्टाचार मंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र यावेळी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासकीय विभागांमार्फत विविध क्षेत्रातील विकास कामांचे व योजनांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात येते. 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विभागांचे एकूण 12 चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते.

सन्मानपत्रप्राप्त अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या विभागीय कर्मचाऱ्यांचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी अभिनंदन केले. भविष्यातही आपण अशीच कामगिरी करून उत्साहपूर्वक योगदान द्यावे असे सांगून त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

प्रथम पारितोषिक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘स्वराज्याचे पहिले सरखेल’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाच्या वतीने सहसंचालक मीनल जोगळेकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. द्वितीय पारितोषिक उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘उच्च तंत्र शिक्षण विभागाची गरुडझेप’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाचे अवर सचिव शशिकांत काकडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘चला मुलींनो खेळूया’या चित्ररथास तर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘गौरव अण्णाभाऊंच्या कार्याचा, जागर जन्मशताब्दी वर्षाचा’ या दोन चित्ररथास तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव स्वाती नानल, आणि सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अवर सचिव सिद्धार्थ झाल्टे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तर उत्तेजनार्थ गृह विभागाच्या ‘सर सलामत तो पगडी हजार’ या ट्रॅफिकच्या चित्ररथास प्रदान करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. पर्यावरण विभागाच्या ‘हवामान बदल: आव्हान व उपाययोजना’ या चित्ररथास उत्तेजनार्थ पोरितोषिक घोषित करण्यात आले. विभागाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सन्मान स्वीकारला. कार्यक्रमावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदान उपस्थित होते.

या चित्ररथांचे गुणांकन करण्यासाठी सर जे.जे.उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता, आणि नाट्य विभागाचे संचालक यांची समिती गठित करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×