कल्याण प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने महाऑनलाईन चित्रकला आणि रांगोळी या कलास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस समारंभ गुरवारी कल्याण पश्चिमेतील मनीषा नगर संपन्न झाला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, मेडल, कलर सेट, ड्रॉइंग पॅड तर रांगोळी स्पर्धेत महिलांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
कोरोना महामारीच्या संकट काळात विद्यार्थी व महिला घरात बसून वैतागले असून त्यांना विरंगुळा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेत सुमारे १५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चित्रकला या स्पर्धेत बालवाडी ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी रंग भरणे स्पर्धा, तिसरी ते सहावी कोरोना योद्ध्यांना प्रणाम, सातवी ते दहावी कोरोना काळात माझे कर्तव्य हे विषय देण्यात आले होते. तर महिलांसाठी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला कोरोना योद्ध्यांना प्रणाम हा विषय देण्यात आला होता.
या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि वह्या वाटप करण्यात आले. तर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना गोल्ड मेडल, प्रमाणपत्र, कलर सेट, ड्रॉइंग पॅड आदी स्वरूपात बक्षीस देण्यात आले तसेच रांगोळी स्पर्धेत महिलांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
गुरवारी कल्याण पश्चिमेतील मनीषा नगर येथे झालेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले, परिक्षक यश महाजन, तुषार देशमुख, निलेश पाटिल, सत्यम पाटील, मितेश बाविस्कर, अनुप आढळराव, राहुल पाटील, आकाश वायले, वैभव देशमुख, बंड्या कराळे, सागर वाघ, देवानंद लांडगे, प्रल्हाद पाटील, सुशील दुसाने आदी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.