नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून अक्षरशः या वन्य प्राण्यांनी शेती शिवारात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांने केली आहे.
शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान हे वन्यप्राणी करत आहे. धुळे जिल्हा वन विभागाने तात्काळ शेतकर्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी राजा हा आता तोंडाशी आलेल्या घास त्याच्या पासून हिरावला जाईल. त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
यावर्षी चांगल्याप्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती परंतु या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. आधीच पाण्याची भीषण टंचाई असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचं काम शेतकरी करत आहे यातच वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान केलं जात असल्याचा समोर येत आहे.या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीमालाचे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटिला आला आहे.