महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा

मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

श्री. ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन श्री ठाकरे यांनी केले आहे.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×