नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – भारतीय तटरक्षक दलाने एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज “वीरा” ने तातडीने पाऊले उचलत नऊ मच्छिमारांना वाचवले. त्यामुळे सगळीकडून भारतीय तटरक्षक दलावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 5 एप्रिल 2024 रोजी बोटीला आग लागल्याने हे मच्छिमार गंभीर जखमी झाले होते. आगीनंतर बोटीला जलसमाधी मिळाली होती. आयसीजीएस वीरा ला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे 65 आणि नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी नौका (आयएफबी) दुर्गा भवानीला आग लागल्याचा जवळच्या मासेमारी बोटीकडून रेडिओ संदेश मिळाला होता. आयएफबी दुर्गा भवानी ही आंध्र नोंदणीकृत बोट 26 मार्च 2024 रोजी काकीनाडा बंदरातून नऊ कर्मचाऱ्यांसह निघाली होती. 5 एप्रिल रोजी बोटीला आग लागल्याने जहाजावरील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्व नऊ मच्छि जीव वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु काहींना गंभीर दुखापत झाली. स्फोटामुळे नुकसान झालेली मासेमारी बोट काही मिनिटांतच त्या ठिकाणी बुडाली. आग आणि स्फोटाची माहिती जवळच्या बोटीद्वारे तटरक्षक दलाच्या जहाजाला देण्यात आली.
परिस्थितीची निकड ओळखून आयसीजीएस वीरा वेगाने पुढे निघाले आणि वाचलेल्यांना मदत देण्यासाठी काही तासांतच त्या ठिकाणी पोहोचले. सर्व नऊ दुखापत झालेल्या मच्छीमारांना तटरक्षक दलाच्या जहाजात हलवण्यात आले तिथे वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने प्रथमो पचार केले.
या दरम्यान, तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 6 ने जेडी फिशरीज विशाखापट्टणम यांच्या समन्वयाने आयएफबी च्या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची तातडीने व्यवस्था केली. सर्व जखमी मच्छिमारांना पुढील उपचारासाठी विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले. आयसीजी जहाजाने दिलेल्या जलद प्रतिसादामुळे संपूर्ण बचाव मोहीम सहा तासांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाली आणि एक मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.