नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या राज्यासह भारतभर सक्रिय आहेत. या टोळ्या लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक करतात. ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार या टोळ्या आत्मसात करत असतात. या टोळ्या महिला, लहान मुलं आणि वृद्ध नगरिकांना आपले लक्ष्य बनवतात. कल्याणात राहणाऱ्या ६७ वर्षीय आजोबांना ऑनलाईन गंडा घातला गेला.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे ६७ वर्षीय जयराम जाधव हे त्यांच्या मुली आणि नातीसोबत राहतात. त्यांना रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या घराचे लाईट बिल भरले गेले नाही. त्वरीत पैसे भरा नाही तर तुमचा वीज पुरवठा आत्ताच खंडीत केला जाईल घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले. लाईट नसेल तर अंधारात रात्र कशी काढणार या भिती पोटी जाधव लाईट बिल भरण्यास तयार झाले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने प्रथम १०० रुपये पाठविण्यास सांगितले. या दोघांचे संभाषण सुरु असताना २० सेंकदात जयराम जाधव यांच्या खात्यातून १ लाख ४४ हजार रुपये गायब झाले. थोड्या वेळात जयराम यांना समजले की, त्यांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी जयराम जाधव यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम यांचे खाते पोलिसांनी गोठविले. खाते गोठविले गेल्याने समोरचा व्यक्ती पैसे काढू शकली नाही. पुढील प्रक्रिया करुन जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे पेसै परत केले. आयुष्याची कमाई चोरी गेली होती. ती पुन्हा मिळाल्याने जयराम जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले. मात्र आपल्या फोनवर कॉल कुठून येतो? कोण मेसेज करतो? तो काय सांगतो? या भूलथापांना नागरीकांनी बळी पडू नये असे आवाहन वारंवार करुन देखील नागरीक बळी पडतात ही दुर्दैवी बाब आहे. याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे.