कल्याण प्रतिनिधी – कोविड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर चष्मा दुकानांचा समावेशही अत्यावश्यक सेवेत करण्याची मागणी कल्याण डोंबिवलीतील चष्मा व्यापाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात कल्याण डोंबिवली ऑप्टिक ओनर्स संघटनेने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून त्यात ही मागणी केली आहे.
केडीएमसीने नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नविन कोवीड निर्बंधांमध्ये चष्मा दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे त्याच्या 2 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी चष्मा दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतू ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नविन निर्बंधांमध्ये चष्मा दुकानांना मात्र परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कल्याण डोंबिवली ऑप्टिक ओनर्स असोसिएशनने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत आमच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याची मागणी केली आहे.
दृष्टी दोष घालवण्यासाठी, डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी चष्म्याचा वापर गरजेचा आहे. तसेच गेल्या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि कार्यालये सुरू झाल्यानंतरही चष्म्याची मागणी आणि वापर वाढल्याचे या संघटनेतर्फे माध्यमांना सांगण्यात आले.
तसेच कल्याण डोंबिवली वगळता मुंबई आणि ठाणेमध्ये चष्मा दुकानांना अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील चष्मा दुकानांनाही परवानगी देण्याची मागणी या चष्मा व्यापाऱ्यांनी केली असून त्यावर आता महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.